खारेगांव उड्डाणपुलाची २० डिसेंबर नवीन डेडलाईन.

खारेगांव उड्डाणपुलाची २० डिसेंबर नवीन डेडलाईन.

पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाईनच्या आधी होणार वाहतुकीसाठी खुला…
खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली माहिती…

ठाणे : दिवाळीपूर्वी खारेगांव उड्डाणपूल सुरु करणार अशी घोषणा करण्यात येऊनही हा उड्डाणपूल अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. आता २० डिसेंबर रोजी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. उड्डाणपुलाचे केवळ ५ टक्के काम शिल्लक असून काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम लांबले. गुरुवारी पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा, महापौर नरेश म्हस्के संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या सर्व अडचणींवर तोडगा काढण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाईनचे काम देखील अंतिम टप्प्यात आले असून त्यापूर्वीच म्हणजेच २० डिसेंबर रोजी उड्डाणपूल सुरु करणार असल्याचे खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
रेल्वे अपघातापासून मुक्तता देणारा आणि कळवा पूर्व-पश्चिमेला जोडणारा खारेगाव उड्डाणपूल दिवाळीपूर्वी सुरु होण्याची शक्यता ठाणे महापालिकेच्या वतीने व्यक्त करण्यात आली होती. या उड्डाणपुलाचे काम आजच्या तारखेला ९४ टक्के झाले असून यामध्ये आरसीसी काम १०० टक्के,बिटमेन काम ९० टक्के,पेंटिंगचे काम ३० टक्के, इलेक्ट्रिक आणि पायऱ्यांचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे जवळपास ९४ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम हे दिवाळीपूर्वी पूर्ण होणार असून याच कालावधीत हा उड्डाणपूल सुरु होण्याची शक्यता आहे असा दावा पालिकेच्या वतीने करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र दिवाळीपूर्वी उड्डाणपूल सुरु होऊ शकलेला नाही.
खारेगांव उड्डाणपुलाच्या संदर्भात गुरुवारी महापालिका मुख्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि संबंधीत अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीला महापौर नरेश म्हस्के देखील उपस्थित होते. काही तांत्रिक कारणांमुळे आणि ठेकेदारांची बिलांचा प्रश्न होता तो या बैठकीत सोडवण्यात आला असल्याची माहिती खासदार शिंदे यांनी यावेळी दिली. पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाईनची चर्चा अनेक वर्षांपासून सुरु असून हे काम देखील अंतिम टप्यात आले आहे. रेल्वे लाईनचे काम देखील फेब्रुवारी पर्यंत संपण्याची चिन्हे असून त्याच्या आधी उड्डाणपूल सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा उड्डाणपूल सुरु झाल्यानंतर खारेगांवचे फाटक कायमस्वरूप बंद होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठेकेदाराला साडेचार कोटींचे बिल तात्काळ अदा होणार…
उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात संबंधित ठेकेदाराचे साडेचार कोटींचे बिलाचा देखील प्रश्न प्रलंबित होता. पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न तात्काळ सोडवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे हे काम २० डिसेंबर पर्यंत होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

रेल्वे अपघात टाळणार …
कळवा पूर्व भागातून पश्चिमेला आणि पश्चिमेतून पूर्वेकडे जाण्यासाठी वाहन चालकांना तसेच नागरिकांना खारेगाव रेल्वे फाटक ओलांडावे लागत होते. मात्र हे रेल्वे फाटक ओलांडताना यापूर्वी या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपुलाची मागणी जोर धरू लागली होती. अखेर या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत आल्याने आता खारेगाव फाटक कायमस्वरूपी बंद होणार असल्याने त्यामुळे या ठिकाणी होणारे अपघातही टळणार आहेत..

Share this post