झोपडपट्टी भागात कचऱ्याची समस्या निर्माण झाल्याचा आरोप सोमवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला..

झोपडपट्टी भागात कचऱ्याची समस्या निर्माण झाल्याचा आरोप सोमवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला..

घरोघरी कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या कचरा वेचक महिलांचे काम तीन महिन्यांपासून थांबविण्यात आले आहे. त्यामुळे झोपडपट्टी भागात कचऱ्याची समस्या निर्माण झाल्याचा आरोप सोमवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. याकामी अडीच कोटींचा खर्च असतांना पालिकेने मात्र या अवघी ५० लाखांचीच तरतूद केल्याने या कामात खोडा बसला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

पालिकेने झोपडपट्टी भागासाठी कचरा संकलनासाठी कचरा वेचक ही संकल्पना पुढे आणली होती. झोपडपट्टीच्या काही भागात घंटागाडी जात नसल्याने अशा ठिकाणी जाऊन कचरा वेचण्याचे काम मागील काही वर्षापासून सुरु होते. यासाठी १२९ महिला बचट गटांना काम देण्यात आले होते. एका बचत गटाला पाचशे ते हजार घरे कचरा वेचण्यासाठी कामे देण्यात आली होती. त्यासाठी ठाणे महापालिका दर महिन्याला वेतन व इतर सोयीसुविधांसाठी सुमारे २७ लाख रुपये खर्च करत होते. या मोबदल्यात हे कचरावेचक घरोघरी कचरा गोळा करून त्याचे ओला- सुका असे वर्गीकरण करत होते. परंतु कोरोनाचा शिरकाव झाला आणि या कामात असलेल्या महिलांना देखील त्याचा फटका बसल्याचे दिसून आले आहे. गणोशोत्सवापासून सध्या झोपडपट्टी भागात कचरा वेचकाचे काम थांबले आहे.

या संदर्भात स्थायी समिती आणि मागील महासभेत देखील चर्चा झाली होती. परंतु अद्यापही हे काम सुरु झालेले नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. अत्यावश्यक बाब असतांनाही यासाठी निधी नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु अत्यावश्यक नसतांनाही इतर किती कामांसाठी निधी खर्च केला याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाकडे मागितली. तर तत्काळ ही सेवा पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे यांनी केली. अखेर दोन ते तीन दिवसात यावर तोडगा काढून काम सुरु केले जाईल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले.

Share this post