कोरोनामुळे अनाथ झालेल्या सज्ञान मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी महापालिकांनी मदत करावी

कोरोनामुळे अनाथ झालेल्या सज्ञान मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी महापालिकांनी मदत करावी

कोरोनामुळे अनाथ झालेल्या सज्ञान मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी महापालिकांनी मदत करावी

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे जिल्हा कृती दलाच्या बैठकीत निर्देश

ठाणे, दि. २७ (जिमाका) : कोरोनामुळे अनाथ झालेल्या सज्ञान मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी महापालिकांनी त्यांच्या निधीतून अशा मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्यास मदत करावी, त्यांना मालमत्ते विषयक हक्क मिळवून द्यावा, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विधवा महिलांना लाभ मिळवून द्यावा व रस्त्यावरील बालकांना महानगरपालिकेतर्फे निवारागृहासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले.

कोरोनाकाळात बालकांची काळजी व संरक्षणासाठी असलेल्या जिल्हा कृती दलाची बैठक नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले. यावेळी कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.

कोरोना कालावधीमध्ये अनाथ झालेल्या परंतू अठरा वर्षापेक्षा जास्त वय असलेले मुल-मुली शिक्षण घेत असतील त्यांना आर्थिक परिस्थिती अभावी शैक्षणिक शुल्क भरता येत नसेल अशा वेळी महानगरपालिकांनी त्यांच्या निधीमधुन ठराविक रक्कम निश्चित करून त्या मुला-मुलींचे शिक्षण थांबणार नाही यासाठी मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांचे वारसाच्या नोंदी करुन त्यांच्या मयत पालकांच्या नावे असलेल्या मिळकतीवर नोंदी करुन घेण्याबाबत महानगरपालिका व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी यावेळी दिल्या. कोरोना कालावधी मध्ये एकूण ४२९ महिला विधवा झाल्या आहेत. त्यांना संजय गांधी योजनेचा लाभ देण्याबाबत त्याबाबत तहसीलदारांना निर्देश देण्यात आले.

सर्वेक्षण झालेल्या रस्त्यावरील मुलं, बालकांसाठी महानगरपालिकेने रात्र निवारागृह किंवा दिवस निवारागृह चालविण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. जागेसाठी लागणाऱ्या सोयी सुविधा या जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत करून द्याव्यात, असेही श्री. नार्वेकर यांनी सांगितले. कृती दलाचे सदस्य सचिव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

००००

Share this post