ठाणे शहरातील कोपरी विभागातील मॉन्सूनपूर्व कामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

ठाणे :- कोपरी परिसरातील विकासकामांचा आणि मॉन्सूनपूर्व करायच्या कामांचा नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. यावेळी तातडीने करायच्या उपाययोजनाबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्याना सूचना दिल्या.
ठाणे पूर्व येथील सिडको बस थांब्यापासून पालकमंत्री शिंदे यांच्या पहाणी दौऱ्याला सुरूवात झाली. या थांब्यावर उभ्या राहणाऱ्या नागरिकांना ऊन पाऊस यापासून संरक्षण देण्यासाठी बस थांब्यावर शेड्स उभ्या करणे, आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण करणे, येथील प्रस्तवित कोळी भवनाचे सुनियोजित उभारणी करणे याबाबत त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचित केले. यानंतर रेल्वे पुलाच्या भागात सूरु असलेल्या रंगरंगोटीच्या कामांची देखील त्यांनी पाहणी केली.
तसेच इथे असलेल्या रेल्वेच्या पुलाखाली खाडीला भरती आल्यावर साचणारे पाणी साचू नये यासाठी तिथे मोठे गेट बसवणे तसेच साचलेले पाणी तातडीने काढण्यासाठी पंप बसवण्यास सांगितले.
चेंदणी कोळीवड्यातील गल्ल्यामध्ये काँक्रीटीकरण करणे, काही वस्त्यांमध्ये सचणारा कचरा तातडीने दूर करणे आणि पाणी प्रश्न सोडवण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देशित केले. तसेच पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी खाडीच्या नजीकच्या वस्त्यांमधील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यास सांगितले.
ठाणे पूर्वेकडील अष्टविनायक चौकात फुटपाथ आणि चौकाचे सुशोभीकरण करण्याबाबत त्यांनी अपेक्षित बदल सुचवले. यानंतर ठाणे पूर्वेतील खाडी किनाऱ्यावर नव्याने तयार करण्यात आलेले उद्यान, अँफी थिएटरच्या कामाची त्यांनी पाहणी केली. कोपरी विसर्जन घाटावर करण्यात आलेल्या शुशोभीकरणाच्या कामाचा आढावा घेऊन ओहोटीच्या वेळी मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर असते त्याचप्रमाणे लोखंडी बंधारा बांधण्याच्या सूचना केली जेणेकरून लोकांना सुरक्षितता बाळगून गणेश विसर्जन करता येईल असे त्यांनी सुचवले. या परिसरातील उर्वरित भागात बगिचा तयार करण्यास सांगितले.ठाणे पूर्व येथील रेतीबंदर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय लक्षात घेता नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रसाधनगृहाचे शिंदे यांनी तत्काळ नारळ फोडून लोकार्पण केले. तसेच हे प्रसाधनगृह नागरिकांना वापरण्यासाठी खुले केले.
ठाणे पूर्व येथील निवासी भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यानातील सुशोभीकरण करण्याबाबत काही गोष्टी सुचवल्या. यावेळी नव्याने बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही आणि मेसेजिंग अलर्ट सिस्टीमचे उद्घाटन केले. या सिस्टीमचा वापर करून कार्यान्वित होणारा हा पायलट प्रकल्प असून त्यात असलेल्या अलर्ट सिस्टीमचा वापर करून आपत्कालीन परिस्थितीत कोणताही तातडीचा संदेश त्या भागात प्रसारित करणे शक्य होणार आहे.
यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा, उपायुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त मनीष जोशी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी नगरसेविका मालती पाटील, माजी नगरसेवक गिरीश राजे, माजी नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर आणि शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.