प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेमार्फत ८५ केंद्रावर लस महोत्सवाचे आयोजन

प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेमार्फत ८५ केंद्रावर लस महोत्सवाचे आयोजन

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील तब्बल ८५ लसीकरण केंद्रावर १५ ते १८ वयोगटातील मुलांचे तसेच १८ वर्षावरील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात व्यापक प्रमाणात लसीकरण मोहिम सुरु आहे. प्रजासत्ताक दिनी मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच गावस्तरावर आणि शहरात असणारे सामान्य रुग्णालय आदि ८५ लसीकरण केंद्रावर नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस घेता येणार आहे. आरोग्य विभागामार्फत १५ ते १८ वयोगट, १८ ते ४५ वयोगट, ४५ ते ६० वयोगट आणि त्यापुढील लाभार्थ्यांना करोना प्रतिबंधक पहिला आणि दुसरा डोस तसेच ६० वर्षावरील, फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी यांना दक्षता डोस देण्यात येणार आहे. तरी या लस महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

Share this post