Omicron Variant मुळे जगभरात भीतीचं वातावरण, अनेक देशांमध्ये आढळले रुग्ण; प्रवासी बंदीसह अनेक कठोर निर्बंध लागू

Omicron Variant मुळे जगभरात भीतीचं वातावरण, अनेक देशांमध्ये आढळले रुग्ण; प्रवासी बंदीसह अनेक कठोर निर्बंध लागू

कोरोना व्हायरसच्या (corona virus) नवीन ओमिक्रॉन या व्हेरिएंटनं (Omicron variant) जगातील सर्व जागतिक नेत्यांची आणि वैज्ञानिकांची चिंता वाढवली आहे.


नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: कोरोना व्हायरसच्या (corona virus) नवीन ओमिक्रॉन या व्हेरिएंटनं (Omicron variant) जगातील सर्व जागतिक नेत्यांची आणि वैज्ञानिकांची चिंता वाढवली आहे. या व्हेरिएंटमध्ये 50 स्पाइक उत्परिवर्तनांच्या उपस्थितीमुळे, ते अत्यंत घातक असल्याचं म्हटलं जात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी चेतावणी दिली की, नवीन व्हेरिएंटमध्ये विविध प्रकारच्या उत्परिवर्तनांमुळे, हा व्हायरस रोगप्रतिकारक (Immune System) शक्तीला हानी पोहोचवू शकतो. सोमवारी जगातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचे या नवीन व्हेरिएंटची प्रकरणं आढळून आली आहेत.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने म्हटलं आहे की, कोविड-19 चे नवीन रूप, ‘ओमिक्रॉन’ हे डेल्टा फॉर्मसह इतर स्वरूपांपेक्षा अधिक सांसर्गिक आहे की नाही आणि त्यामुळे अधिक गंभीर आजार होतो की नाही हे “स्पष्ट नाही”. WHO नं म्हटलं की, ओमिक्रॉनशी संबंधित लक्षणे इतर स्वरूपांपेक्षा वेगळी आहेत असे सुचविणारी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ओमिक्रॉन फॉर्मची तीव्रता पातळी समजण्यासाठी अनेक दिवस किंवा अनेक आठवडे लागतील.

WHO ने रविवारी जगभरातील इतर देशांना आवाहन केलं की ओमिक्रॉनच्या चिंतेमुळे दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घालू नये. मात्र, असं असतानाही विविध देशांनी प्रवासावर बंदी घातली आहे. जगभरातील कोणत्या देशांमध्ये, Omicron व्हेरिएंटची प्रकरणे आढळली आहेत, त्यावर एक नजर टाकूया

बोत्सवाना: या आफ्रिकन देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचं पहिलं प्रकरण नोंदवलं गेलं. मात्र, रविवारपर्यंत येथील रुग्णांची संख्या 19 वर गेली आहे. यामध्ये गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या 4 रुग्णांचाही समावेश आहे. बोत्सवानाच्या आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

ऑस्ट्रेलिया: आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना व्हायरसचा एक नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनच्या 5 प्रकरणांची नोंद झाली आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय सीमा कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी पुन्हा खुली करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेतला.

ऑस्ट्रिया: माहिती देताना आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, सोमवारी ऑस्ट्रियामध्ये ओमिक्रॉन प्रकाराचे पहिले प्रकरण आढळून आले. कोरोनाच्या चौथ्या लाटेशी झुंजणाऱ्या ऑस्ट्रियामध्ये आधीपासून लॉकडाऊन लागू आहे.

इस्रायल : इस्रायलनं रविवारी परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. इतर देशांतून परतणाऱ्या इस्रायली नागरिकांना निगेटिव्ह पीसीआर चाचणी द्यावी लागणार असून 3 दिवस क्वारंटाईनचा नियम अनिवार्य करण्यात आला आहे. 4 आठवड्यांपूर्वी, इस्रायलने आपल्या सीमा परदेशी नागरिकांसाठी खुल्या केल्या.

ब्रिटन: यूकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणं आहे की, देशात कोविडची 2 प्रकरणे आढळली आहेत.जी दक्षिण आफ्रिकेतून परतणाऱ्या प्रवाशांशी संबंधित आहेत. या दोन्ही नागरिकांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले असून चौकशी सुरू आहे. ब्रिटीश सरकारने इतर चार आफ्रिकन देशांवर प्रवास बंदी घातली आहे.

जर्मनी: म्युनिक-आधारित मायक्रोबायोलॉजी सेंटरने सांगितले की जर्मनीमध्ये ओमिक्रॉन प्रकाराची 2 पुष्टी झालेली प्रकरणे आढळली आहेत. हे नागरिक 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून जर्मनीत परतले. दरम्यान व्हायरसच्या या व्हेरिएंटच्या जीनोम अनुक्रमाचे निकाल अद्याप येणे बाकी आहेत.

इटली: मोझांबीहून परतलेल्या एका इटालियन नागरिकाला ओमिक्रोन व्हेरिएंटची लागण झाल्याचं आढळून आले. ही व्यक्ती 11 नोव्हेंबर रोजी इटलीत आली होती. त्याच्या कुटुंबात राहणाऱ्या 5 सदस्यांपैकी दोन मुले देखील कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

डेन्मार्क: जगभरातील ओमिक्रॉन प्रकारांबद्दल वाढत्या चिंतेमध्ये डेन्मार्कमध्ये एक नवीन प्रकरण आढळले आहे.

नेदरलँड्स: डच आरोग्य प्राधिकरणाने रविवारी सांगितले की दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या 13 लोकांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळला आहे. 600 पैकी 61 प्रवासी कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आलेत.

हाँगकाँग: येथे देखील Omicron व्हेरिएंटची 3 प्रकरणे आढळली आहेत. मात्र, शहर पुन्हा सुरू करण्याच्या योजनेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं प्राधिकरणाने म्हटलं आहे.

पोर्तुगाल: आरोग्य प्राधिकरणाने सोमवारी सांगितलं की, देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटची 13 प्रकरणे समोर आली आहेत.

स्कॉटलंड: सोमवारी देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटची 6 प्रकरणे आढळून आली. मात्र, यातील काही प्रकरणे दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासाशी संबंधित नसल्यानं स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे.

कॅनडा: रविवारी कॅनडामध्ये ओमिक्रॉन प्रकाराचे पहिलं प्रकरण आढळून आले. येथे 2 नागरिक नुकतेच नायजेरियाहून परतले होते. दोन्ही रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून आरोग्य अधिकारी त्याची सतत चौकशी करत आहेत.

बेल्जियम: शनिवारी कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्यानंतर बेल्जियममध्ये कोविडचे नियम कडक करण्यात आले. यामध्ये मास्क घालणे आणि परदेशी प्रवाशांची चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

त्याच वेळी भारतात, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने उच्च जोखमीच्या श्रेणीमध्ये ठेवलेल्या देशांची यादी जारी केली आहे. या देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांना काही नियमांचे पालन करावे लागेल. यामध्येही चाचणी अनिवार्य असेल.

यूकेसह सर्व युरोपीय देश

दक्षिण आफ्रिका

ब्राझील

बांगलादेश

बोत्सवाना

चीन

मॉरिस

न्युझीलँड

झिंबाब्वे

सिंगापूर

हाँगकाँग

इस्रायल

Share this post